Tuesday, May 1, 2018

विज्ञान राक्षस : 2 : पानसे गुरुजी

2.

विज्ञान राक्षस : 2 : पानसे गुरुजी

___________________________
तर बालमित्रांनो,
ही गोष्ट सुरू होते एका लहानशा गावात ... डोंगर पायथ्याशी वसलेले एक लहानसे गाव… त्या गावातील नव्यानेच सुरु झालेली शाळा… अभ्यासाचा आणि त्यातल्या त्यात विज्ञान विषयाचा कंटाळा असणारे विद्यार्थी  आणि त्या शाळेत नव्यानेच आलेले पानसे गुरुजी…


ठण ऽऽ ठण ऽऽ… दोन तास झाल्याचे टोले पडले. पानसे गुरुजींनी डस्टर व खडू घेतला आणि मुख्याध्यापकांच्या आज्ञेप्रमाणे ते नववीच्या वर्गावर मोकळा तास (off period ) घेण्यास जायला निघाले. गुरुजी वर्गात डोकावले. वर्गातली काही पोरे घाईघाईने दुसऱ्या पोरांच्या गृहपाठाची (homework) कॉपी उतरवीत होती. धोब्याचा महाद्या व न्हाव्याचा बारक्या एकमेकांच्या उरावर बसले होते. “ए, गप्प बसा मुकाट्यानं, आता देशपांडे गुरुजी येतील” म्हणून वर्ग सेक्रेटरी (class moniter) केकाटत होता. पण त्या कडे लक्ष न देता भुयाचा विष्ण्या व पाटलाचा वश्या एकमेकांचा उद्धार करीत होते. पानसे गुरुजी वर्गात आले आणि पोरांची पळापळ झाली. सर्व मुले उभी राहिली.

“एकसाथ नमस्ते !” प्रथे प्रमाणे मुलांनी सरांना नमस्ते ठोकला.

“नमस्ते, बसा सर्वजण,” पानसे गुरुजी म्हणाले.

“बसलो...”असा खोडसाळपणे आवाज देत मुले खाली बसली.

नवीनच आलेल्या शिक्षकांना ही वर्गाची पहिली सलामी होती. मास्तर आता चिडून काहीतरी करणार ; पण त्याला वेळ मिळायला नको म्हणून एका मुलाने साळसूदपणे प्रश्न केला,

" सर, तुमचं नाव काय ?"

आणि मागोमाग मागच्या बाकावरून आवाज आला,

 "सर, नाव घ्या ना !!"

मुले फिदीफिदी हसली व एकदम गप्प बसली. मुलांना वाटले आता मात्र मास्तर नक्की गरम होणार.

" माझं नाव यशवंत सदाशिव पानसे. या शाळेत आजच नवीन आलोय," पानसे गुरुजी शांतपणे उत्तरले

तेवढ्यात एका मुलाने विचारले ,

" सर, तुम्ही आम्हाला काय शिकवणार ?"

या द्वयर्थी प्रश्नावर काही मुलांनी मिश्किल हास्य केले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पानसे गुरुजी म्हणाले,

" हा तास घेणारे तुमचे नेहमीचे शिक्षक अकरा दिवसांच्या रजेवर आहेत."

ही बातमी ऐकून पोरे एकदम हरखली. त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अकरा दिवस आता डोक्याला ताप नाही अन् पाठीला मार नाही. केवढी आनंदाची बातमी दिली नव्या गुरुजींनी !!

"त्यांच्या ऑफ तासावर मी आलोय. हं .. बोला, कसला तास आहे हा ?" पानसे गुरुजींनी प्रश्न केला.

"सर, मराठीचा."

हा विज्ञानाचा तास आहे हे कोणी सांगू नये म्हणून बाळ्याने झटकन उत्तर दिले.

"नाही सर, तो बंडल मारतोय. हा तास इतिहासाचा आहे." दुसऱ्या एकाने आपण प्रामाणिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

"सर, हे दोघेही थापांडे आहेत. हा तास भूगोलाचा आहे." लक्षाने आपल्या आवडत्या विषयाचे घोडे पुढे दामटले.

पानसे गुरुजींनी विज्ञान विषय शिकवू नये म्हणून हा सारा खटाटोप होता.

जमल्यास गप्पाटप्पा मध्ये वेळ काढण्याचा मुलांचा प्रयत्न पानसे गुरुजींनी हेरला.

" हा तास विज्ञानाचा आहे हे मला माहित आहे. पण तुमच्यापैकी कोण थापाडे आहेत हे पाहण्यासाठीच मी हा प्रश्न विचारला."

पानसे गुरुजीच्या वरच्या आवाजातील या विधानाने वर्गात एकदम शांतता पसरली. पानसे गुरुजी आता विज्ञान शिकविणार म्हणून पोरे वैतागली. मुलांची चुळबुळ सुरू झाली. विज्ञानाचा तास म्हणजे मरण. आता एक तास सर्वांना स्वर्गवास ! काहीतरी करून ही वैतागवाडीची सफर टाळली पाहिजे म्हणून पांडूने मोठ्या धिटाईने सरांना विनंती केली,


"सर प्लीज आज शिकवू नका. आम्ही आपला मराठीचा अभ्यास करत बसतो."


" हो सर, आम्ही अगदी मुकाटयानं वाचत बसतो." सद्याने री ओढली.


"अरे, पण तुमचा विज्ञानाचा अभ्यास मागे पडेल. परीक्षा जवळ आली ना ?" पानसे गुरुजी विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव देत बोलले.


"सर, आमचा सगळा पोर्शन शिकवून झालाय. " पानसे गुरुजीनी विज्ञान शिकवू नये म्हणून बंड्याने बेधडक बंडल ठोकले.


ठीक आहे, " पानसे गुरुजी म्हणाले , " तर मग आपण शिकविलेल्या भागाची उजळणी करू या. तुम्हालाच परीक्षेत जास्त गुण मिळतील"

परीक्षा जवळ आली असताना सुद्धा मुले विज्ञान शिकण्याची टाळाटाळ का करीत आहेत हे पानसे गुरुजींच्या लक्षात येईना. कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून, ज्या विषयाचा तास आहे तोच विषय या मोकळया तासाला घेण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता; तर तेच टाळण्याचा प्रयत्न पोरे वेगवेगळ्या
प्रकारे करीत होती. पानसे गुरुजी आता उजळणी घेणार म्हणून सर्वांचा आवाज बंद होता. पोरे हताश झाली. शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून नाम्या म्हणाला,

" सर, आम्ही रोज घरी अभ्यास करतो. आज आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना."

पानसे गुरुजींनी नाम्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. एकंदरीत पानसे गुरुजींचे गोष्ट सांगण्याचे लक्षण दिसेना. अखेर शेवटी सर्व उपाय संपल्यावर मुलांनी अखेरीचा इलाज म्हणून वर्गात " गोष्ट सांगा " " गोष्ट सांगा" म्हणून गोंधळ सुरू केला. मुलांना शरण जाणे पानसे गुरुजींना मान्य नव्हते. पण प्रथम गोंधळ थांबविण्यासाठी त्यांनी तात्पुरती माघार घेतली.

बरं बाबांनो, गोष्ट सांगतो. पण असा गोंधळ करू नका.

"सांगा, सांगा, सर," चारपाच विद्यार्थी एकदम आनंदाने ओरडले .

" कोणती गोष्ट सांगू ?" पानसे गुरुजींनी विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून प्रश्न केला.

"सर, रामाची गोष्ट सांगा," नाम्याने फर्माइश केली.

"ती गोष्ट नको, सर मारुती ... ... " सद्याने आपला आवड पुढे घुसडली.

सर, या सर्व गोष्टी आमच्या पाठ आहेत. अगदी नवीनच मस्त गोष्ट सांगा," लाल्याने सरांना विनंती केली.

"आज तुम्हाला नवीन व चांगली गोष्ट सांगतो." पानसे गुरुजीच्या या आश्वासनामुळे सर्व वर्ग शांत झाला. सर्वजण गोष्ट ऐकण्याच्या तयारीत बसले. पानसे गुरुजी गोष्ट सांगू लागले.

" अशाच एका शाळेतील नववीच्या वर्गातील दोन मुलांची ही गोष्ट आहे."

गोष्टीची सुरुवात ऐकुनच पोरे चापापली. त्यांना वाटले आपल्यावरच ही गोष्ट असावी. पहिले वाक्य झाल्या झाल्या सद्य उठला व म्हणाला,

सर, गोष्टीचं नाव सांगा आधी."

"ए सद्या, बस गुमान खाली," मुलांनी ओरडून सद्याला खाली बसविले.

" गोष्टीला नाव नंतर देऊ, प्रथम गोष्ट सांगतो, चालेल ?" पानसे गुरुजी वर्गाला विश्वासात घेत म्हणाले.

"चालेल, चालेल सर. गोष्ट लगेच सुरू करा. गोष्ट ऐकायला उत्सुक असलेल्या मुलांनी तत्काळ संमती दिली.

पानसे गुरुजी गोष्ट पुढे सांगू लागले :

एकाचे नाव सुदाम व दुसऱ्याचे नाव ज्ञानेश्वर. दोघेही एकाच ओळीत राहात होते. ज्याचे लवकर आवरेल तो दुसऱ्याला शाळेत जाताना हाक द्यायचा. दोघे मिळून शाळेत जायचे. एकाच बाकावर बसायचे. मिळूनच शाळेतून परत यायचे. अगदी जिगरी दोस्त होते एकमेकांचे. एक दिवस असेच दोघेजण शाळेत चालले होते. चालता चालता सुदाम म्हणाला,

" देन्या, आज लई खुशीत दिसते स्वारी. विज्ञानाचा गृहपाठ केलायस वाटतं ?

"सुदाम्या, आज तूच गृहपाठ केलेला दिसतोय. म्हणून एवढया रुबाबात मला विचारतोस काय ? " ज्ञानू उत्तरला.

" देन्या लेका, उगाच काय मस्करी करतोस. अर, सायन्सचं एवढे ज्ञान असतं तर कशाला मार खाल्ला असता रोज वर्गात ?" काकुळतीने सुदाम म्हणाला.

" म्हणजे सायन्सचा गृहपाठ केला नाहीस तर तू पण"

आपल्याला जोडीदार मिळाल्याच्या आनंदात देन्याने उडी मारली.

"देन्या, लेका खोटं कशाला सांगू? अगदी आईच्यानं सांगतो, मी गृहपाठ केलेला न्हाय" सुदामाने कबुली दिली.

"बेस्ट दे टाळी. मी पण गृहपाठ केला नाही,"ज्ञानू आनंदाने ओरडला.

" देतो रे टाळी, पण आज वर्गात मार खायची आहे पाळी!" सुदाम गंभीरपणे उत्तरला.

" खरंच की रं! " ज्ञानेश्वर भानावर येऊन उद्गारला, "लई कंटाळलो या सायन्सला. सुदाम्या, याला काहीतरी तोड काढ बाबा."

सुदाम व ज्ञानेश्वर दोघेही चिंतेत पडले काय करावे ते दोघांनाही सुचेना. दोघेही विचार करू लागले. इतक्यात सुदाम मध्येच चुटकी वाजवून म्हणाला,

" हां, अरे अगदी नामी तोड सापडली. बेस्ट आयडिया देन्या, दे टाळी. आळी मिळी गुप चिळी. मी काय सांगतो ते नीट ऐक. कोणाला काय सांगायचं न्हाय " ... ..

ठण ऽऽ ठण ऽऽ ठण ऽऽ

तिसरा तास संपला. पानसे गुरुजी वर्गाबाहेर जायला निघाले. मुलांनी गोष्ट पुढे सांगण्याचा आग्रह धरला.

"अरे, आता आणखी दहा दिवस तुम्हाला गोष्टच ऐकायची आहे

पानसे गुरुजींनी मुलांची समजूत काढली व ते वर्गाबाहेर पडले.
___________________________
विज्ञान राक्षस
" विज्ञानावर आधारित शास्त्रीय नियमांची आलटा पालट झाली तर काय गम्मत घडेल हे सांगणारी विज्ञान कल्पनिका .."
लेखक :
पु. ग. वैद्य © 1977
संपादन व पुनर्लेखन :
प्रसाद पोफळी
9822569648

No comments:

Post a Comment

विज्ञान राक्षस : 5 : हळूनगरी

5. विज्ञान राक्षस : 5 : हळूनगरी _____________________________________ दुसरा तास संपल्याचे दोन टोले झाले. पानसे गुरुजी नववीचा क्लास घे...