Wednesday, May 9, 2018

विज्ञान राक्षस : 5 : हळूनगरी

5.

विज्ञान राक्षस : 5 : हळूनगरी
_____________________________________

दुसरा तास संपल्याचे दोन टोले झाले. पानसे गुरुजी नववीचा क्लास घेण्यासाठी बाहेर येऊन हजर झाले. वर्गात इंग्रजीचा दुसरा तास चालू होता. बाई ‘हाय’ ही कविता शिकवीत होत्या.

"आय् नो अ क्युरियस लिटल बॉय
हु इज अल्वेज आसकिंग व्हाय ?
व्हाय धिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ
व्हाय नॉट, व्हाय - बाय अॅण्ड बाय् ?

वर्गाबाहेर उभ्या असलेल्या पानसे गुरुजींना या कवितेच्या ओळी फारच आवडल्या. त्याच ओळी ते गुणगुणू लागले. बाईच्या लक्षात आले की, आपला तास संपला आहे आणि पुढच्या तासाचे शिक्षक बाहेर येऊन उभे आहेत. लगेच त्यांनी शिकविणे थांबविले व त्या वर्गाबाहेर पडल्या.

पानसे गुरुजी ‘हाय’ कवितेच्या ओळी गुणगुणतच वर्गात शिरले. पोरे 'एकसाथ नमस्ते' म्हणाली आणि त्यांनी एकसाथ ' टिंग टॉंग
पिग पॉंग' हा मंत्र म्हटला. तोच धागा पकडून पानसे गुरुजीनी गोष्ट पुढे सुरू केली.

सुदाम व ज्ञानेश्वर यांनी हा मंत्र तीन वेळा म्हटला. नंतर त्यांनी डोळे उघडले, तर काय आश्चर्य ! खरोखरच दोघेही कल्पना ग्रहावरील
एका बंगल्याच्या दिवाणखान्यात पोचलेले..!!सुदाम व ज्ञानेश्वर यांनी सबंध दिवाणखानाभर
एक नजर फिरविली. बसायला उत्तम कोच. मध्यभागी एक टी-पॉय. यावर लाल लाल सफरचंदे असलेली एक थाळी होती. थकले
भागलेले दोन्ही लहान जीव भुकेलेलेही होते. दोघेही कोचावर आरामात विसावले आणि त्यांची नजर टी-पॉयवरील सफरचंदांवर खिळली. दोघांनीही एकमेकांना खूण केली व थाळीतील एक सफरचंद खाण्यासाठी हातात घेतले. दोघेही सफरचंदाला तोड लावणार इतक्यात ...

"टक्, टक्, टक्" असा आवाज दाराच्या दिशेने आला.

दोघेही दचकले.. तोंडाला लावलेले सफरचंद बाजूला करीत त्यांनी दाराकडे नजर टाकली.. पण दारात कोणीच नव्हते.. दार सताड उघडेच.. दोघांनाही वाटले, आपल्याला भास झाला.

झाल्या घटनेकडे दुर्लक्ष करून दोघेही सफरचंद तोंडाला लावणार इतक्यात पुन्हा दारावर टक् टक् आवाज .. दोघेही थबकले.. त्यांनी दाराकडे
निरखून पाहिले. दारात तर कोणीच दिसत नव्हते. दोघेही भांबावून गेले. चेष्टामस्करी करायची म्हणून कोणीतरी दारावर टक टक करून पळून जात असले पाहिजे, असा संशय त्यांना आला. या नवख्या जागी नेमके काय
करावे ते त्यांना सुचेना.. पोटातले कावळे काव काव करून कातावले. यामुळे वैतागून पुन्हा या घटनेकडे दुर्लक्ष करून दोघांनीही सफरचंद तोंडाला लावले. तोच ... पुन्हा दारावर टक ठक् ..

आता मात्र सुदाम व ज्ञानेश्वर चिडले. "ए देन्या, बघ रे दारात कोण हाय ते ?" सुदाम टक टक प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बोलला.

ज्ञानेश्वर वैतागून ताडकन उठला व दाराबाहेर कोण आहे हे पहाण्यासाठी पळत दाराकडे गेला. तोच दारात त्याची कोणाशी तरी जोरात टक्कर झाली.

अग आई ऽ ग ! कोण आहे ? " ज्ञानेश्वर कळवळून बोलला.

"नमस्कार, मी सर्वज्ञे .. या ग्रहावरील जनता संपर्काधिकारी. " कोठूनतरी एक आवाज आला.

"अहो जनता संपर्काधिकारी ! कसली धडक मारलीत माझ्या छातीत रानडुकरासारखी. आणि असं लपून दारावर टक् टक् का केलीत ?"

ज्ञानेश्वर कहत कण्हत रागाने बोलला. ज्ञानेश्वरला आता समोर कोणीतरी एक व्यक्ती दिसू लागली होती.

"असे रागावू नका. मी आपल्याला सगळे काही सांगतो. प्रथम थोडे शांत रहा." जनता संपर्काधिकारी शांतपणे उद्गारला.

"शांत काय व्हा ? तुम्हाला काय म्हणायचे ते लवकर बोला. " सुदाम वैतागून आता समोर दिसणाऱ्या व्यक्तीशी बोलला.

"तुम्ही इथं कल्पना ग्रहावरील हळूनगरीत आला आहात हे ध्यानात घ्या. इथं प्रकाशाची गती एका मिनिटास एक मीटर आहे. त्यामुळं …" सर्वज्ञ यांनी सुदाम व ज्ञानेश्वर यांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला.

“ इथं प्रकाशाची गती एका मिनिटाला एक मीटर आहे म्हणून तुम्हाला दुसऱ्याला रानडुकरासारख्या धडका मारण्याचा काय अधिकार?" देनू कळवळून बोलला.

"अहो, माझा खुलासा नीट पुरता ऐकून तरी घ्या. इथं.." सर्वज्ञ विनवणीच्या सुरात बोलू लागले.

"कसला खुलासा करताय् टक्कुऱ्याचा ? तुमच्या धडकेनं माझ्या छातीत चांगलीच चमक भरलीय. अग आई ऽ ग " देनू हाताने छाती चोळीत बोलला.

"प्रथम बेधडक धडक मारायची आणि नंतर त्यावर खुशाल खुलाशाचे मलम लावायचे. ही काय वागण्याची पद्धत झाली?" सुदामने आता
तोंडाचा पट्टा चांगलाच सैल सोडला.

“अहो, जरा तोंड सांभाळून बोला . माझी काहीच चूक नाही. या हळूनगरीत .." इतका वेळ शांत असलेले सर्वज्ञे रागाने बोलले.

"मग काय माझी चूक आहे? वा गुरू." देनूने सर्वज्ञाना पुरते बोलू न देता त्यांच्यावरच आरोपांची सरबत्ती केली.

सुदाम, ज्ञानेश्वर व सर्वज्ञ यांच्यांत चांगलीच बाचाबाची सुरू झाली.. ही गोष्ट ऐकण्यात देहभान हरपलेल्या नाम्या सातपुतेला सुदाम व ज्ञानेश्वर यांच्यावर झालेला अन्याय सहन झाला नाही. गोष्ट सुरू असतानाच नाम्या उठला व म्हणाला,

"सर, खरं म्हणजे चूक त्या जनता संपव अधिकाऱ्याचीच आहे"

"अरे, जनता संपव अधिकारी नव्हे जनता संपर्काधिकारी." पानसे गुरुजी नाम्याला समजावीत होते.

" त्योच, जो कोन असेल त्यो. पण चूक त्याचीच आहे." तुक्या ढेरेने नाम्याला साथ दिली.

" असं कसं म्हणता ? खरं म्हणजे.." पानसे गुरुजी सर्वज्ञांची बाजू घेत आहेत हे पोरांनी ताडलं. त्याना सरांचे म्हणणं मान्य नव्हते.

" वा ऽ सर, दुसऱ्याच्या घरी आलेल्या अनोळखी माणसाची अशी चेष्टा करावी काय ? " पांडबानी सुदाम व ज्ञानेश्वराची बाजू घेतली.

" सर, चूक त्या अधिकाच्याचीच आहे. " वर्गातील सर्व मुलांनी ही सुदाम व ज्ञानेश्वरच्या बाजूने कौल दिला.

"अरे पण ही गोष्ट आहे." पानसे गुरुजींनी गुगली टाकली.

"सर, गोष्ट असली म्हणून काय झालं ? उगाच मारलेली धडक कोणी का म्हणून सहन करायची ? " वर्गातली मुले ठामपणे उत्तरली.

या वाक्याने पानसे गुरुजीच्या विचारांना मात्र धडक बसली. त्यांना आनंद झाला. ते गालातल्या गालात हसले..

‘कोण म्हणतं हा वर्ग वात्रट पोरांचा आहे ? यांना तर गोष्टीत झालेला अन्याय देखील सहन होत नाही. यांना वात्रट कोणी म्हणावं ? यांना कोणी वाह्यात ठरवावे ? मुळात मुलं वात्रट असतात का ? का परिस्थिती त्याना तशी घडवते ? आणि आपण ? आपण त्यावर शिक्कामोर्तब करतो. शिकविलेलं समजत नाही म्हणून शिकण्यात आनंद नाही. मग अभ्यास कोण करणार ?? नव्हे, मुलांनी अभ्यास का करावा ? नापास होणारी मुलं ही शिक्षक पालक, नातेवाईक, समाज या सर्वांच्या मते अगदी वाह्यात कार्टी .., या मुलांच्या अंगी अजिबात गुण नसतात काय ? का या गुणांचे दर्शन घडवून देणारं वातावरण निर्माण होत नाही ? हे वातावरण कुणी निर्मायचं?'

पानसे गुरुजी आढयाकडे टक लावून अशा विचारात मग्न होते.

"सर, सुदाम व ज्ञानेश्वर यांची चूक कशी ते आम्हाला पटवून द्या." दोन-तीन मुलांनी प्रश्न विचारून पानसे गुरुजींची तंद्री भंग केली.

त्याचवेळी चंदूने चोरलेला चेंडू चड्डीतून चुकून खाली पडून चक्क वर्गात घरंगळत टेबलाकडे चालला होता..

पानसे गुरुजी तो घरंगळून आलेला चेंडू हातात घेत म्हणाले, "बघू या कोणाची चूक आहे ती."

चंदू चपापला.. पानसे गुरुजीनी आपले निवेदन सुरू केले.. मुले कान टवकारुन ऐकू लागली..

प्रथम आपण आपल्याला पदार्थ कसे दिसतात ते पाहू. प्रकाशाच्या उगमस्थानापासून म्हणजे दिवसा सूर्यापासून, रात्री दिव्यांपासून असंख्य
प्रकाशकिरण बाहेर पडत असतात. हे किरण पदार्थावर पडून परावर्तित होतात.

"सर, परावर्तित होतात म्हणजे काय ? " शिंप्याच्या जगूने मध्येच प्रश्न विचारला.

पोरांना वाटले आता मध्येच प्रश्न विचारण्याबद्दल जग्या मार खाणार देशपांडे गुरुजीच्या तासाला यामुळेच कोणी प्रश्न विचारीत नसे. काही पोरांनी सरांना नकळत जग्याला खाली बसण्याची खूण केली. शेजारीच बसलेल्या नाम्याने जग्याचा शर्ट पण ओडला. सगळया वर्गाचे लक्ष आता काय घडणार इकडे लागले.

" शाब्बास जगन्नाथा ! चांगला प्रश्न विचारलास तू मुलांनो, जगन्नाथासारखे न घाबरता तुम्हीही वर्गात प्रश्न विचारले पाहिजेत." पानसे गुरुजीनी वर्गाला आवाहन केले वर्ग आनंदला.

'अरे, सरांनी आपल्याला प्रश्न विचारायला परवानगी दिली. देशपांडे सरांच्या तासाला प्रश्न विचारला की बसला मार. इतर सरांनाही त्यांच्या शिकविण्याची तंद्री भंग केलेली आवडत नाही. काही शिक्षक तर 'नंतर सांगतो, बस खाली' असे म्हणून बोळवण करतात आणि इकडं तर पानसे गुरुजी जगन्नाथाची पाठ थोपटताहेत.' मुले चांगलीच चक्रावून गेली.

पानसे गुरुजीनी परावर्तनाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी हातातील चेंडू भिंतीवर मारला व ते म्हणाले,

"हे पहा, मी भिंतीवर मारलेला चेंडू भिंतीवर आपटून परत आला. असे प्रकाशकिरण पदार्थावर पडतात व परत येतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. समजल का जगन्नाथा ?"

जग्याने ऐटीत मान डोलवून आपली समज सरांना कळविली.

"पदार्थावर पडून परावर्तित झालेले किरण आपल्या डोळ्यात गेले की तो पदार्थ आपल्याला दिसतो." पानसे गुरुजींनी पदार्थ कसा दिसतो याचे स्पष्टीकरण पूर्ण केले.

" तुमच्यासमोर दोन मीटर अंतरावर जर एखादा पदार्थ असेल तर तो तुम्हाला किती वेळानं दिसेल ?" पानसे गुरूजींनी प्रश्न केला.

"पदार्थावरील परावर्तित किरण पदार्थापासून डोळ्या पर्यंत पोचण्यास जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळाने पदार्थ दिसेल," दोन-तीन मुले एकदम म्हणाली.

"सर, म्हणजेच प्रकाशकिरणांना दोन मीटर अंतर तोडायला जेवढा वेळ लागेल तेवढया वेळानं पदार्थ दिसेल." जग्याने मुलांच्या उत्तरात दुरुस्ती केली.

"बरोबर, प्रकाशाची गती एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर .. म्हणजेच एका सेकंदाला तीस कोटी मीटर आहे, हे ध्यानात घ्या. एवढया
प्रचंड वेगानं प्रकाशकिरण प्रवास करत असतात," पानसे गुरुजींनी सांगितले.

" अबबब ... ! सेकंदात तीस कोटी मीटर अंतर तोडायचे ? म्हणजे फारच जंगी वेगानं प्रकाश धावतो म्हणायचा!" मुलांनी प्रकाशाच्या प्रचंड
वेगाचे कौतुक केले

"याचा अर्थ तीस कोटी मीटर अंतर तोडावयाला प्रकाशाला केवळ एक सेकंद लागतो. तर दोन मीटर अंतर प्रकाश किती वेळेत कापील ?"
पानसे गुरुजींनी मुलांना साधे त्रैराशिक घातले.

"सर, दोन भागिले तीन कोटी सेकंद" एक दोन पोरांनी झटक्यात उत्तर दिले.

" म्हणजे, सर, सेकंदाचा अगदी अगदी लहान भाग. " दोन-तीन मुलांनी त्यांच्या भाषेत त्यांची समज व्यक्त केली.

"म्हणजे प्रकाशाची एवढी प्रचंड गती आहे म्हणूनच आपल्यासमोर पदार्थ आपल्याला अत्यंत अल्प वेळात म्हणजेच लगेच दिसतो," पानसे गुरुजी एक कल्पना मुलांच्या गळी उतरविल्याच्या आनंदात बोलले.

प्रकाशाच्या प्रचंड गतीबद्दल प्रकाशाला धन्यवाद देत मुलांनी माना डोलावून पानसे गुरुजींना आपल्याला ही कल्पना पटल्याचा होकार दिला.

मुलांच्या उत्साहाचा फायदा घेऊन पानसे गुरुजींनी पुढचा प्रश्न विचारला, "समजा, प्रकाशाची गती एका मिनिटाला एक मीटर झाली तर दोन मीटर अंतरावरचा पदार्थ आपल्याला किती वेळाने दिसेल ?

प्रश्न अगदीच सोपा होता.

" दोन मिनिटांनी सर," सर्व मुलांनी ओरडून उत्तर दिले .

"शाब्बास रे माझ्या गब्रूंनो ! मग हळूनगरीतील दोन मीटर अंतरावर असलेला संपर्काधिकारी ज्ञानेश्वर व सुदाम यांना किती वेळाने दिसेल ?"
पानसे गुरुजींनी विजयी मुद्रेने प्रश्न केला.

"अर्थातच, दोन मिनिटांनी,"मुलांनी खजील होऊन उत्तर दिले.

"पण सर, टक् टक् आवाज आधी कसा ऐकू आला ?" पांड्याने आपली शंका विचारली.

पानसे गुरुजी म्हणाले, " याचंही उत्तर आता तुम्हीच सांगा. ध्वनीचा वेग एका सेकंदाला ३३० मीटर आहे. ..."

"म्हणजे ३३० मीटर अंतर तोडण्यास एक सेकंद तर दोन मीटर अंतर तोडण्यास किती वेळ लागेल ? " दोन-तीन मुलांनी पानसे गुरुजींचे
वाक्य पुरे केले

"सर, दोन भागिले ३३० इतके सेकंद" दुसऱ्या चारपाच मुलांनी लगेच उत्तर दिले.

"म्हणजे दोन मिनिटांपेक्षा कितीतरी कमी वेळ. म्हणूनच टक टक आवाज आधी ऐकू आला, पण समोरची व्यक्ती उशिरा दिसली. त्यामुळे सुदाम व ज्ञानेश्वर यांची चांगलीच फसगत झाली. या हळूनगरीत प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी वेगानं म्हणजे एका मिनिटास एक मीटर यापेक्षा
कमी वेगानं प्रत्येक कृती करणं का आवश्यक आहे हे तुम्हाला समजलं का? पानसे गुरुजींनी आपला खुलासा पूर्ण केला.

" म्हणूनच या नगरीला 'हळूनगरी' हे नाव ठेवलं असावं,.." पांडबा नकळत बोलून गेला.

" पांडवा, नामदेवराव, कळलं का आता चूक कोणाची आहे ती ?" बाळ्याने पांड्याला व नाम्याला डिवचले.

“ कळलं कळलं बरं! तुम्ही नको आम्हाला शहाणपण शिकवायला."

"अरे, असे भांडू नका." पानसे गुरुजींनी पांडू, नामदेव व बाळू यांची समजूत काढली. मग ते म्हणाले,

"पण एक गोष्ट ध्यानात घ्या. या हळूनगरीत स्थिर पदार्थाच्या बाबतीत कोणताच गोंधळ होत नाही."

"सर, ते कसं काय ?" बाळा मध्ये बोलला

"कारण स्थिर पदार्थावर पडले किरण परावर्तित होउन जात असतात. त्यामुळे पदार्थाकडे पाहिले की परावर्तित किरण लगेच डोळ्यात जातात व स्थिर पदार्थ मात्र आपल्याला लगेच दिसतो."

पानसे गुरुजींनी पोरांना आता चांगलेच ताब्यात घेतले होते.

ठण.. ठण.. ठण ....
तिसरा तास संपल्याची घंटा झाली. पानसे गुरुजी म्हणाले, "मुलांनो,.मी.आज तुम्हाला गृहपाठ देणार आहे. याल का करून उद्या ? "

गृहपाठ म्हटल्यावर पोरे बिथरली व गप्पच बसली. कोणीच होकार दिला नाही. तरीही पानसे गुरुजींनी आपला गृहपाठ सांगण्यास सुरुवात केली.

"सुदाम व ज्ञानेश्वर या हळूनगरीत पृथ्वीवरच्या सवयीप्रमाणे कृती करणार, हे साहजिकच आहे. या कृती हळूनगरीतील प्रकाशाच्या गतीपेक्षा
जास्त गतीने होणार, हे उघडच आहे. त्यामुळे त्यांची कशी फजिती होते. यावर प्रत्येकाने लहानसा गंमतीशीर प्रसंग लिहून आणा. पण लक्षात ठेवा, प्रकाशाची गती एका मिनिटाला एक मीटर फक्त... बाकी इतर सर्व नियम
पृथ्वीवरच्या नियमाप्रमाणे."

हा गंमतशीर गृहपाठ ऐकुन पोरे हरखली. काय गंमतशीर प्रसंग लिहावा यावर प्रत्येकजण विचार करू लागला. गृहपाठ दिल्यावर आनंदी दिसणारे चेहरे पाहून समाधानाने पानसे गुरुजी वर्गाबाहेर पडले.

___________________________________

विज्ञान राक्षस

" विज्ञानावर आधारित शास्त्रीय नियमांची आलटा पालट झाली तर काय गम्मत घडेल हे सांगणारी विज्ञान कल्पनिका .."

लेखक :
पु. ग. वैद्य © 1977
संपादन व पुनर्लेखन :
प्रसाद पोफळी
9822569648

Saturday, May 5, 2018

विज्ञान राक्षस : 4 : राक्षसाशी गाठ

4.

विज्ञान राक्षस : 4 : राक्षसाशी गाठ
___________________________


ठण ऽऽ ठण ऽऽ इंग्रजीचा दुसरा तास संपला. कुलकर्णीबाई वर्गातून बाहेर पडल्या. पोरांच्यावरची वसवस संपली. तुम्हाला धड शुद्ध मराठी बोलता येत नाही, तर तुम्ही इंग्रजी काय शिकणार ?" त्या जाता जाता शेरा मारून गेल्या.

वर्गात खेडघातल्या पोरांची त्यांच्या खेडवळ उच्चारावरून हेटाळणी व्हायची. 'नर्मदेतले गोटे' म्हणून त्यांना पदवीदान व्हायचे. प्रत्येक तासाला
थोडेफार असेच घडायचे. तास कधी संपेल असे पोरांना वाटायचे. त्यात पानसे गुरुजींचा पुढचा तास गोष्टीचा. त्यामुळे दुसरा तास सपता संपायचा
नाही. दुसरा तास केव्हा संपतो हे पाहण्यासाठी हल्ली बरीच मुले शाळेत घड्याळ घालून यायला लागली होती. मग वारंवार घडघाळात पाहिल्या
बद्दल बोलणी पण खात होती.

दुसरा तास संपल्यावर सर्वांच्या डोक्यांत एकच विचार होता. 'आता त्या राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या सुदाम व ज्ञानेश्वर यांचे काय होणार ?’ मुले तर्कवितर्क करीत होती. यावरच चर्चा चालू होती. इतक्यात पानसे गुरुजी वर्गात आले. मुलांचा ‘एकसाथ नमस्ते ' झाला. पानसे गुरुजींनी 'बसा' म्हटल्यावर सर्व वर्ग बसला. पण तुक्या ढेरे मात्र उभाच होता.

त्याने सरांना विचारले, "सर, त्या आग्यावेताळाने त्या पोरांना खाल्लं का हो ?"

"अरे, असा अधीर होऊ नकोस पुढची गोष्ट ऐक म्हणजे सारं काही समजेल. " असे म्हणून पानसे गुरुजीनी गोष्ट पुढे सुरू केली :

खडकातून निघणारा धूर व धुरातून ऐकू येणारा हसण्याचा आवाज दोन्ही जोरजोरात वाहू लागले. सुदाम व ज्ञानेश्वर यांची अगदी घाबरगुंडी उडाली. दोघांनीही घट्ट डोळे मिटून घेतले.

सुदाम ज्ञानेश्वरच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला, "ए देन्या, अरं हा तर भुताचा आवाज "

“ कोण भू भू भूत ...?" ज्ञानूची बोबडी वळाली.

"हा… हा… हा… मी भूत नाही," धुरामधून आवाज आला.

"अरे बापरे, भू भू भूत नाही तर मग, तुम्ही कोण ? भूतोजीराव आहात?" सुदामने भीत भीत प्रश्न केला.

"अरे, भूत नाही म्हणून एकदा सांगितलं ना ? मग पुन्हा भुतोजीराव काय म्हणतोस ?

" चु.. चु.. चुकलं भुतोजीराव."

" बघ, पुन्हा म्हणालास का भुतोजीराव.."

"मा… मा… माफ करा. मग आपण कोण वेताळराव आहात ?"

"मी वेताळ पण नाही."

" अगदी खरंच ? मग म्हण बरं राम राम तीन वेळा ." देनू उसने अवसान आणत म्हणाला.

"राम, राम, राम, झाली का आता खात्री ? मी विज्ञानराक्षस आहे. हा.. हा.. हा.. घाबरू नका.. डोळे उघडा."

'राक्षस' म्हटल्यावर सुदाम व ज्ञानेश्वर दोघेही हादरले त्यांना घामच फुटला. दोघांनीही हळूच डोळे किलकिले करून समोर पाहिले. आणि
काय ? खरेच समोर एक राक्षस उभा होता !

भला मोठा प्रचंड देह.. कमरेवर हात.. डोक्यावर टोपल्याच्या आकाराची फिरती एन्टिना.. त्यावर सतत वेगवेगळ्या लहरी येत-जात होत्या.. याशिवाय डोक्यात ट्रान्झिस्टरच्या एरियलसारख्या पाचसात एरियल होत्या.. एन्टिना व एरियल यामुळे राक्षसाला जगात कुठे काय चालले आहे ते दिसत व ऐकू येत असावे.. त्याचे डोळे म्हणजे हजार कँडलपॉवरचे लालभडक दिवेच.. त्यांची सारखी उघडझाप चालू होती.. बुद्धासारखे कानात ताणकाटे कोंबत होते.. गळ्यात पाचसात आधुनिक पद्धतीचे मीटर्स, यंत्रे यांची माळ होती.. दंडवर वायर्स गुंडाळलेल्या होत्या व त्यावर एक ट्रान्समीटर होता.. हातातील मनगटात घड्याळासारखी यंत्रे होती.. कमरेभोवतालच्या पट्टयात वेगवेगळ्या प्रकारचे तापमापक होते.. त्यातील पारा खाली वर होत होता . इतरही अनेक उपकरणे कमरेला लटकलेली... छातीवर, पोटावर पायावर गणित, विज्ञान, रसायन यांतील विविध सूत्रे लिहिलेली...
शरीरावरील वेगवेगळ्या मीटरचे आवाज… टक्, क्लिक.. टक्, क्लिक .. वातावरणातील शांततेला भेडसावीत होते.. हसण्यासाठी उघडलेला जबडा म्हणजे एक भली मोठी गुहाच.. त्याच्या हसण्याने आसपासचा परिसर अगदी दणाणून गेला होता...

गोष्टीतल्या राक्षसाप्रमाणे हा राक्षस आता आपल्याला खाणार या कल्पनेने सुदाम व ज्ञानेश्वर अगदी गांगरून गेले.. त्यांचे पाय लटलट कापू लागले.. अंग थरथरू लागले.. दोघेही घामाने डबडबले ..

काय रे पोरांनो, तुम्ही इकडे कशासाठी आलात?" विज्ञानराक्षसाने थोडे दरडाडूनच विचारले.

सुदाम व ज्ञानेश्वर यांच्या तोंडून शब्द फुटेना .. त्यांची दातवीळ बसली..

सुदाम व ज्ञानेश्वर यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही म्हणून राक्षस पुन्हा म्हणाला,
" ए बच्चांनो, शाळा बुडवून इकडे आलात ना ? खोटे बोलू नका. "

राक्षसाला सारे माहीतच दिसत होते. तेव्हा त्याला शरण जाण्याखेरीज सुदाम व ज्ञानेश्वर यांना दुसरा मार्ग नव्हता. सुदामने थोडा धीर केला. हात जोडले व राक्षसाला विनवणीच्या स्वरात तो म्हणाला, "राक्षस महाराज, आम्ही तुम्हाला समदं अक्षी खरं खरं ते सांगतो. पण तुम्ही आम्हाला खाऊ नगा."

"हा.. हा.. हा.. मी तुम्हाला मुळीच खाणार नाही, खुळ्या पोरांनो."

राक्षसाच्या या उत्तराने सुदाम व ज्ञानेश्वर यांना हायसे वाटले. सुदाम म्हणाला,

"काय म्हणता ! तुम्ही आम्हाला खाणार नाही ? राक्षस महाराज, तुम्ही लई चांगले आहात. पण शपथ घेऊन सांगा की, तुम्ही आम्हाला खाणार नाही म्हणून."

"अरे वेड्यांनो, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. मी लोकांना खाणारा राक्षस नाही. मी विज्ञानयुगातील विज्ञानराक्षस आहे. मी सर्वांना मदत करतो. अज्ञानाचा अंधार पळवतो. अडचणीतून मार्ग दाखवितो. तुम्हालाही काय पाहिजे ती मदत देईन. पण तुम्ही माझ्याशी खोट बोलता कामा नये."

विज्ञान राक्षस मुलांना अभय देत म्हणाला :

राक्षसाच्या आश्वासनामुळे सुदाम व ज्ञानेश्वर यांच्या जीवात जीव आला.

"राक्षसमहाराज, खरोखरच तुम्ही किती किती चांगले आहात ! मी मारलेला दगड तुम्हाला लागला नाही ना ? माझा काही तुम्हाला मारण्याच हेतू नव्हता. "सुदाम दिलगिरीच्या सुरात म्हणाला.

" फालतुक बडबड बंद करा. तुम्हाला काय पाहिजे ती मदत लवकर मागा." राक्षसाने जणू हुकूमच सोडला.

सुदाम व ज्ञानेश्वर अगदी गोंधळून गेले. त्यांना काहीच सुचेना. जिवावर बेतलेला प्रसंग दूर तर झालाच आणि शिवाय हवी ती मदत देण्याचे
आश्वासन. आणखी काय हवे ?

सुदाम हळू आवाजात ज्ञानेश्वरला म्हणाला,
"ए देन्या, माग ना तूच काही तरी. "

" मला काय मागावं तेच सुचेना," देन्या कुरकुरला.

"ए देन्या, सांग ना आपल्याला तो विज्ञानाचा अभ्यास जमत नाही म्हणून विज्ञानातले ते वेडेवाकडे नियम बदलून एकदम सोपे करा म्हणावं. कायमची कटकट तरी मिटेल. " सुदामने डोळे चाळविले,

ज्ञानूने सगळा धीर गोळा केला आणि बोलला,
"बरं का राक्षसमहाराज, हे आपलं विज्ञान आहे ना विज्ञान...., याचं काय आहे , आपले विज्ञान आहे ना ......"

"ऐकलं सगळे … तुम्हाला विज्ञानातले नियम समजत नाहीत. हेच ना ? " राक्षसाने वाक्य पुरे केले.

"हो ना आम्हाला विज्ञान अजिबात समजत नाही. त्यामुळे त्यावरील गृहपाठ पण जमत नाहीत. गृहपाठ न केल्याबद्दल होणारी शिक्षा चुकविण्या
साठी आम्ही शळा बुडवून फिरत फिरत इकडे आलो.", देनुने एका दमात सगळे सांगून टाकले.

"आमची अभ्यास करण्याची इच्छा आहे पण ते विज्ञान आमच्या डोक्यातच शिरत नाही. काय ती प्रकाशाची दांडगी गती ! एका सेकंदाला एक मिटर वेगाने धावला तर मरल काय बेटा ? " सुदामनेही आपले मन मोकळे केले.

"ध्वनी प्रकाशासारखा सरळ रेषेत गेला व प्रकाश ध्वनीसारखा सर्व दिशांनी गेला तर काय जाईल त्याच्या बाचं ! आणखी ...." ज्ञानेश्वरला आणखी बरेच काही सांगायचे होते. मुले अगदी मोकळेपणाने बोलत होती.

"बस, बस, आलं सारं माझ्या लक्षात. विज्ञानातील वेगवेगळ्या नियमांचे महत्व तुम्हाला पटलेले दिसत नाही. हीच ना तुमची मुख्य अडचण ?" राक्षसाने जणू त्यांच्या मनातलेच जाणले.

"अगदी खरे आहे हे राक्षस महराज. तुम्ही देता का हे नियम आम्हाला समजावून ? " सुदामने राक्षसाला विनंती केली.

"आम्हाला हे नियम समजले, पटले तर आम्ही अगदी रोज अभ्यास करू, अगदी आई शप्पथ."

"नियम समजल्यावरही आम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही आम्हाला खुशाल खाऊन टाका. " सुदाम व ज्ञानेश्वर यांनी राक्षसाना ग्वाही दिली.

पोरे अगदी कळवळून बोलत होती. आपल्याला काहीही येत नाही याची त्यांना जाणीव होती. पण कोण चांगले शिकवले तर शिकण्याची त्यांची तयारी होती. राक्षसाने त्यांचे मन जाणले. मग राक्षसाने त्यांना सांगितले,

"ठीक आहे बाळांनो, मी तुमची मनोकामना पूरी करतो. इकडे या... या या अंगठ्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात घाला.. घातल्यात ..?
आता डोळे मिटा आणि मी सांगतो तो मंत्र तीन वेळा म्हणा. लगेच तुम्ही कल्पना नावाच्या ग्रहावर जाऊन पोचाल. तिथे समजेल तुम्हाला सारं काही.... "

"हं, म्हणा मंत्र तीन वेळा...."

"आला मंतर कोला मंतर
गुंडू, फोंडू, यंडू, धोंडू ..
जंतर मंतर काम कलंतर
किट-कॅट, फिट-फॅट ..
जल्दी जल्दी तोडकर अंतर
टिंग-टॉंग पिंग-पॉंग ..
ले चल हमको कल्पना ग्रहपर. "

पानसे गुरुजींच्या तोंडून हा गमतीचा मंत्र ऐकून वर्गातल्या पोरांना हसू फुटले.

" वा ऽ वा ऽ एकदम झकास मंत्र !"

मुलांचा हा शेरा ऐकून गुरुजी पुढची कथा सांगू लागले ..

सुदाम व ज्ञानेश्वर यांनी अंगठया घातल्यावर राक्षसाने सांगितलेला मंत्र डोळे झाकून तीन वेळा म्हटला...

"आणि ..? आणि पुढे काय झालं असेल ..? विचार करा बघू..!! " पानसे गुरुजींनी मुलांच्यात प्रश्न सोडला. अन् घंटा झाल्यामुळे पानसे गुरुजी
निघून गेले.

गोष्टीशी एकरूप झालेली मुले तर्कवितर्क करू लागली. पोरां मनांत आता एकच मंत्र घोळत होता -
"टिंग-टॉंग पिंग-पॉंग ..
ले चल हमको कल्पना ग्रहपर. . "

सारी पोरे हाच मंत्र गुणगुणत होती. पुढच्या तासाला आलेल्या शिक्षकांना कळेना.. इयत्ता नववीच्या इरसाल कार्टयांनी हे काय नवीनच फॅड
काढलंय ..?? काय तर म्हणे- पिंग-पॉंग, टिंग-टॉंग ...
___________________________

विज्ञान राक्षस

" विज्ञानावर आधारित शास्त्रीय नियमांची आलटा पालट झाली तर काय गम्मत घडेल हे सांगणारी विज्ञान कल्पनिका .."

लेखक :
पु. ग. वैद्य © 1977
संपादन व पुनर्लेखन :
प्रसाद पोफळी
9822569648

विज्ञान राक्षस : 3 : शाळेला दांडी

3.

विज्ञान राक्षस : 3 : शाळेला दांडी
__________________________

ठणऽ ठणss
नववीच्या मोकळ्या तासावर जाण्यासाठी पानसे गुरुजी निघाले. पानसे गुरुजी नववीच्या वर्गात येऊन पोचले. मुलांनी एकसाथ नमस्ते केला. वर्गात आज नेहमीची गडबड बडबड नव्हती. वर्गातली जवळजवळ सर्व मुले हजर होती. पानसे सर दहा दिवस गोष्ट सांगणार या बातमीचा सुगावा त्यांना लागलेला होता.

"सर, गोष्ट पुढे सुरू करा," मुलानी सरांना आठवण करून दिली.

"हो बरोबर कुठपर्यंत आली होती बरं आपली गोष्ट?" पानसे गुरुजींनी प्रश्न केला.

"सुदामला काहीतरी नामी युवती सापडली." दोनचार मुले पटकन उतरली.

“बरोबर, बरोबर अरे, अगदी नामी युक्ती सापडली." पानसे गुरुजी वेगळयाच अर्थाने म्हणाले व गोष्ट पुढे सांगू लागले :

"सांगा सुदाम सेठ आपली नामी युक्ती ? " देन्याने उत्सुकतेने विचारणा केली.

"देन्या लेका, लई सोपा उपाय हाय बग. अरं, सरळ शाळेला दांडी मारायची !" सुदाम उद्गारला.

"काय पण नामी तोड काढली माझ्या राजानं ! म्हणे शाळेला दांडी मारायची! म्हणजे सायन्सच्या सरांचा आजचा मार चुकवून उद्या हेडसरांचा मार खायचा. आजचे मरण उद्यावर जाईल एवढेच. आपल्याला नाही हे जमायचं." देन्याने आपला नकार स्पष्ट सांगितला .

"अरं देन्या, माझ्या मर्दा, ऐकुनश्यानं तर घे. आधीच काय नाट लावतुयास!" सुदाम ज्ञानेश्वरची समजूत काढीत म्हणाला.

"काय बोलू नगस जादा, शाळेला दांडी मारल्याचं माझ्या बा ला कळलं तर हाड्डी नरम होईल माझी घरला." देन्याने आपला नकार पक्का केला.

"देन्या! देन्या! अरं येडा का खुळा तू? कोण माकडीचा सांगतो शाळा बुडवल्याचं तुझ्या घरला? सुदाम देन्याची समजूत काढण्याचा
प्रयत्न करीत होता.

"लेका, समदं गाव आपल्याला वळखतं. शाळा सुटल्यावर कुठ बी उंडारलो तरी आपल्या घरला त्याचा पत्या लागणारच," देन्या सुदामगशी हुज्जत घालीत होता.

"अरं, कोण म्हणतं आपण शाळा सुटल्यावर गावात हिडायचं म्हणून? आपण आपला तडक गावाबाहेरचा रस्ता धरायचा. ओढयाकाठी
जायचं. चिंचा, जांभळ, बोरे खायची. कोण येतंय तिकडे कडमडायला?"

सुदाम वेगवेगळी आमिषे दाखवून देन्याला शाळेला दांडी मारायला तयार करीत होता, पण देन्या काही त्याला दाद देत नव्हता. त्याची आपली नकारघंटा कायमच होती.

सुदाम पुढे म्हणाला, "या ओढयापासून दोन एक कोसावर एक देवीचे देऊळ हाय. कुणाला बी ती देवी पावते. आपण जाऊन तिची प्रार्थना
करू या. 'आम्हाला चांगली बुद्धी दे… आम्हाला विज्ञान येऊ दे… आमचा मार सुटू दे…' ए देन्या, आता ऐक माझं, चल मुकाट्यानं, आपला कायमचा त्रास टळेल."

बिचारा देन्या सुदामच्या बोलण्याला भुलला व म्हणाला, " सुदाम्या, ही तुझी आयडिया लई बेस हाय. चल लवकर, आपण देवीला नवस बोलू या.

सुदाम व ज्ञानेश्वर होतात हात घालून गावाच्या वेशीच्या दिशेने चालू लागले. ते घाईघाईने चालले होते, पण तोंडाने गात होते -

चला आज बुट्टी मारू अन् मजा करायला जाऊ

जाऊ गावाबाहेर तिथे ओढा वाहे
तिथे अभ्यास नाही, त्याची भीती नाही
मनसोक्त रानात हिंडू
मनसोक्त पाण्यात डुंबू

चला आज बुट्टी मारू अन् मजा करायला जाऊ

रानात झाडेच झाडे, नको म्हणणे पाढे
चढु झाडावरती, खाऊ फळे किमती
नको ती चार भिंतीतली शाळा
चला सारे गावाबाहेर पळा

चला बुट्टी मारू अन् मजा करायला जाऊ

सुदाम व ज्ञानेश्वर गावातल्या आडरस्त्यांनी ओळखीची घरे, माणसे चुकवीत गावाबाहेरील एका ओढयावर येऊन ठेपले. ओळखीचे कोणी आडवे आले नाही याबद्दल समाधानाचा सुस्कारा सोडीत पाण्यात पाय सोडून ओढयाकाठी येऊन बसले. ओढ्याचे पाणी झुळझुळ वाहत होते. आसपास हिरवीगार झाडी होती. झाडावर पक्ष्यांची किलबिल चालू होती. वाऱ्यामुळे ऊन भासत नव्हते. तंगडतोड करून दमले भागलेले सुदाम व ज्ञानेश्वर थोडा वेळ तेथेच विसावले.

आता दोघेही निर्धास्त होते. इतका वेळ अबोल असलेले जीव आता बोलू लागले.

पानसे गुरुजीनी खिशातून रुमाल काढून तोंड पुसले. थोडा वेळ थांबून ते गोष्ट पुढे सांगू लागले.

"अहाहा ! काय मस्त वातावरण आहे! नाहीतर आमचा वर्ग ! वैतागलो बुवा या शाळेला विज्ञान विषयामुळे !" ज्ञानूने आपला शाळेवरील
राग व्यक्त केला.

"तर काय ? प्रकाश पळतोय भरधाव वेगानं मोकाट सुटल्यागत आणि त्याचे नियम ध्यानात ठेवण्याची जबरी आम्हाला. काय घेणे रे
आम्हाला त्याच्याशी ?" सुदामने विज्ञान विषयावरचा त्याचा तिरस्कार प्रगट केला.

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचे आम्हाला काय आकर्षण ? फुकटच त्यावरची उदाहरणे सोडविण्याची कटकट तेवढी ! परवा मी वर्गात
विद्युतचा एक नियम चुकीचा सांगितला तर सरांना म्हणे त्याचा चक्क शॉक बसला," वैतागाने ज्ञानू म्हणाला.

"आणि मी प्रकाशाची गती एका मिनिटाला एक मिटर संगितली तर सरांनी माझी पाठ मीटर पट्टीनं एक मिनिट सडकली. अग आई ऽ ग !अजून तो मार आठवला की अंग दुखायला लागतं." सुदामने आपली व्यथा व्याकुळतेने व्यक्त केली .

हे समदं खरं पण हे चुकवायला शाळेला रोजच्या रोज कशी दांडी मारणार? सुदाम्या, तू म्हणत होतास ती देवी खरंच प्रसन्न होती का रे ?"
ज्ञानूने सुदामला देवीची आठवण करून दिली.

सुदाम हसला व लगेच गंभीरही झाला. वैतागून हातातला दगड समोरच्या खडकावर भिरकावीत तो म्हणाला, " कायमचा उपाय? हा बघ कायमचा. विज्ञानयुगात जगायचे आहे ना?
मग मरा या विज्ञानाचा अभ्यास करून !"

पण हे काय! सुदामनं ज्या खडकावर दगड मारला होता त्या खडकातून हळूहळू धूर निघू लागला. सुदामने त्या धुराकडे निरखून पाहिले.
आणि तो चांगलाच घाबरला. त-त-प-प करीत तो देन्याला म्हणाला,

" देन्या, तो बघ, तो बघ. या खडकातून धूर निघतोय बघ."

ज्ञानेश्वरने सुदामने दाखविलेल्या दिशेकडे पाहिले आणि तोही किचाळला,

सुदाम, अरं, खरंच की रं!"

पोरे श्वास आवरून पानसे गुरुजींची गोष्ट ऐकत होती. पानसे गुरुजी गोष्ट पुढे सांगत होते :

खडकातून निघणान्या धुराचे प्रमाण आता वाढले होते. सुदाम अन् ज्ञानेश्वर दोघेहो घाबरून गेले. सुदाम घाबऱ्या स्वरात म्हणाला,

"अग आई ऽ ग ! अरे हाच तो गावाबाहेरचा आग्यावेताळाचा खडक. "

आता मात्र मेलो आपण,’ असे म्हणून ज्ञानेश्वर गळा काढून रडू लागला.

सुदामने त्याला कसेबसे सावरले व त्याला धीर देण्यासाठी तो म्हणाला,

" देन्या, असं वंगाळ बोलू नगस आपण डोळे मिटून राम राम म्हणू या काय, म्हणजे वेताळ आपल्याला काही करणार नाही."

भयभीत झालेले सुदाम व ज्ञानेश्वर एकमेकांना बिलगुन राम राम म्हणू लागले. समोरच्या खडकातून अधिकच जोराने धूर निघू लागला.
आणि या धुरातून मोठयाने हसण्याचा आवाज आला.

" हा ऽ हा ऽ हा ऽ हा ऽ हा ऽ हा ऽ हा ऽ हा. हा ऽ हा ऽ हा ऽ ऽ

पोरे जिवाचा कान करून ऐकत होती. पानसे गुरुजी गंभीरपणाने सांगत होते.

राक्षस ! ! आता तर गोष्टीला खरी मजा -' पोरांच्या मनात आले

पण इतक्यात --
ठण ऽ ठण ऽ ठण ... ३ तास संपल्याची घंटा झाली. पोरांची तोंडे एकदम उतरली.

" ही घंटा इतक्या घाईने कशाला झाली ! कोणीतरी पुटपुटले.

पानसे गुरुजी गालातल्या गालात हंसले; आणि शांतपणे वर्गाबाहेर पडले.
___________________________
विज्ञान राक्षस
" विज्ञानावर आधारित शास्त्रीय नियमांची आलटा पालट झाली तर काय गम्मत घडेल हे सांगणारी विज्ञान कल्पनिका .."
लेखक :
पु. ग. वैद्य © 1977
संपादन व पुनर्लेखन :
प्रसाद पोफळी
9822569648


Tuesday, May 1, 2018

विज्ञान राक्षस : 2 : पानसे गुरुजी

2.

विज्ञान राक्षस : 2 : पानसे गुरुजी

___________________________
तर बालमित्रांनो,
ही गोष्ट सुरू होते एका लहानशा गावात ... डोंगर पायथ्याशी वसलेले एक लहानसे गाव… त्या गावातील नव्यानेच सुरु झालेली शाळा… अभ्यासाचा आणि त्यातल्या त्यात विज्ञान विषयाचा कंटाळा असणारे विद्यार्थी  आणि त्या शाळेत नव्यानेच आलेले पानसे गुरुजी…


ठण ऽऽ ठण ऽऽ… दोन तास झाल्याचे टोले पडले. पानसे गुरुजींनी डस्टर व खडू घेतला आणि मुख्याध्यापकांच्या आज्ञेप्रमाणे ते नववीच्या वर्गावर मोकळा तास (off period ) घेण्यास जायला निघाले. गुरुजी वर्गात डोकावले. वर्गातली काही पोरे घाईघाईने दुसऱ्या पोरांच्या गृहपाठाची (homework) कॉपी उतरवीत होती. धोब्याचा महाद्या व न्हाव्याचा बारक्या एकमेकांच्या उरावर बसले होते. “ए, गप्प बसा मुकाट्यानं, आता देशपांडे गुरुजी येतील” म्हणून वर्ग सेक्रेटरी (class moniter) केकाटत होता. पण त्या कडे लक्ष न देता भुयाचा विष्ण्या व पाटलाचा वश्या एकमेकांचा उद्धार करीत होते. पानसे गुरुजी वर्गात आले आणि पोरांची पळापळ झाली. सर्व मुले उभी राहिली.

“एकसाथ नमस्ते !” प्रथे प्रमाणे मुलांनी सरांना नमस्ते ठोकला.

“नमस्ते, बसा सर्वजण,” पानसे गुरुजी म्हणाले.

“बसलो...”असा खोडसाळपणे आवाज देत मुले खाली बसली.

नवीनच आलेल्या शिक्षकांना ही वर्गाची पहिली सलामी होती. मास्तर आता चिडून काहीतरी करणार ; पण त्याला वेळ मिळायला नको म्हणून एका मुलाने साळसूदपणे प्रश्न केला,

" सर, तुमचं नाव काय ?"

आणि मागोमाग मागच्या बाकावरून आवाज आला,

 "सर, नाव घ्या ना !!"

मुले फिदीफिदी हसली व एकदम गप्प बसली. मुलांना वाटले आता मात्र मास्तर नक्की गरम होणार.

" माझं नाव यशवंत सदाशिव पानसे. या शाळेत आजच नवीन आलोय," पानसे गुरुजी शांतपणे उत्तरले

तेवढ्यात एका मुलाने विचारले ,

" सर, तुम्ही आम्हाला काय शिकवणार ?"

या द्वयर्थी प्रश्नावर काही मुलांनी मिश्किल हास्य केले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पानसे गुरुजी म्हणाले,

" हा तास घेणारे तुमचे नेहमीचे शिक्षक अकरा दिवसांच्या रजेवर आहेत."

ही बातमी ऐकून पोरे एकदम हरखली. त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अकरा दिवस आता डोक्याला ताप नाही अन् पाठीला मार नाही. केवढी आनंदाची बातमी दिली नव्या गुरुजींनी !!

"त्यांच्या ऑफ तासावर मी आलोय. हं .. बोला, कसला तास आहे हा ?" पानसे गुरुजींनी प्रश्न केला.

"सर, मराठीचा."

हा विज्ञानाचा तास आहे हे कोणी सांगू नये म्हणून बाळ्याने झटकन उत्तर दिले.

"नाही सर, तो बंडल मारतोय. हा तास इतिहासाचा आहे." दुसऱ्या एकाने आपण प्रामाणिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

"सर, हे दोघेही थापांडे आहेत. हा तास भूगोलाचा आहे." लक्षाने आपल्या आवडत्या विषयाचे घोडे पुढे दामटले.

पानसे गुरुजींनी विज्ञान विषय शिकवू नये म्हणून हा सारा खटाटोप होता.

जमल्यास गप्पाटप्पा मध्ये वेळ काढण्याचा मुलांचा प्रयत्न पानसे गुरुजींनी हेरला.

" हा तास विज्ञानाचा आहे हे मला माहित आहे. पण तुमच्यापैकी कोण थापाडे आहेत हे पाहण्यासाठीच मी हा प्रश्न विचारला."

पानसे गुरुजीच्या वरच्या आवाजातील या विधानाने वर्गात एकदम शांतता पसरली. पानसे गुरुजी आता विज्ञान शिकविणार म्हणून पोरे वैतागली. मुलांची चुळबुळ सुरू झाली. विज्ञानाचा तास म्हणजे मरण. आता एक तास सर्वांना स्वर्गवास ! काहीतरी करून ही वैतागवाडीची सफर टाळली पाहिजे म्हणून पांडूने मोठ्या धिटाईने सरांना विनंती केली,


"सर प्लीज आज शिकवू नका. आम्ही आपला मराठीचा अभ्यास करत बसतो."


" हो सर, आम्ही अगदी मुकाटयानं वाचत बसतो." सद्याने री ओढली.


"अरे, पण तुमचा विज्ञानाचा अभ्यास मागे पडेल. परीक्षा जवळ आली ना ?" पानसे गुरुजी विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव देत बोलले.


"सर, आमचा सगळा पोर्शन शिकवून झालाय. " पानसे गुरुजीनी विज्ञान शिकवू नये म्हणून बंड्याने बेधडक बंडल ठोकले.


ठीक आहे, " पानसे गुरुजी म्हणाले , " तर मग आपण शिकविलेल्या भागाची उजळणी करू या. तुम्हालाच परीक्षेत जास्त गुण मिळतील"

परीक्षा जवळ आली असताना सुद्धा मुले विज्ञान शिकण्याची टाळाटाळ का करीत आहेत हे पानसे गुरुजींच्या लक्षात येईना. कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून, ज्या विषयाचा तास आहे तोच विषय या मोकळया तासाला घेण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता; तर तेच टाळण्याचा प्रयत्न पोरे वेगवेगळ्या
प्रकारे करीत होती. पानसे गुरुजी आता उजळणी घेणार म्हणून सर्वांचा आवाज बंद होता. पोरे हताश झाली. शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून नाम्या म्हणाला,

" सर, आम्ही रोज घरी अभ्यास करतो. आज आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना."

पानसे गुरुजींनी नाम्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. एकंदरीत पानसे गुरुजींचे गोष्ट सांगण्याचे लक्षण दिसेना. अखेर शेवटी सर्व उपाय संपल्यावर मुलांनी अखेरीचा इलाज म्हणून वर्गात " गोष्ट सांगा " " गोष्ट सांगा" म्हणून गोंधळ सुरू केला. मुलांना शरण जाणे पानसे गुरुजींना मान्य नव्हते. पण प्रथम गोंधळ थांबविण्यासाठी त्यांनी तात्पुरती माघार घेतली.

बरं बाबांनो, गोष्ट सांगतो. पण असा गोंधळ करू नका.

"सांगा, सांगा, सर," चारपाच विद्यार्थी एकदम आनंदाने ओरडले .

" कोणती गोष्ट सांगू ?" पानसे गुरुजींनी विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून प्रश्न केला.

"सर, रामाची गोष्ट सांगा," नाम्याने फर्माइश केली.

"ती गोष्ट नको, सर मारुती ... ... " सद्याने आपला आवड पुढे घुसडली.

सर, या सर्व गोष्टी आमच्या पाठ आहेत. अगदी नवीनच मस्त गोष्ट सांगा," लाल्याने सरांना विनंती केली.

"आज तुम्हाला नवीन व चांगली गोष्ट सांगतो." पानसे गुरुजीच्या या आश्वासनामुळे सर्व वर्ग शांत झाला. सर्वजण गोष्ट ऐकण्याच्या तयारीत बसले. पानसे गुरुजी गोष्ट सांगू लागले.

" अशाच एका शाळेतील नववीच्या वर्गातील दोन मुलांची ही गोष्ट आहे."

गोष्टीची सुरुवात ऐकुनच पोरे चापापली. त्यांना वाटले आपल्यावरच ही गोष्ट असावी. पहिले वाक्य झाल्या झाल्या सद्य उठला व म्हणाला,

सर, गोष्टीचं नाव सांगा आधी."

"ए सद्या, बस गुमान खाली," मुलांनी ओरडून सद्याला खाली बसविले.

" गोष्टीला नाव नंतर देऊ, प्रथम गोष्ट सांगतो, चालेल ?" पानसे गुरुजी वर्गाला विश्वासात घेत म्हणाले.

"चालेल, चालेल सर. गोष्ट लगेच सुरू करा. गोष्ट ऐकायला उत्सुक असलेल्या मुलांनी तत्काळ संमती दिली.

पानसे गुरुजी गोष्ट पुढे सांगू लागले :

एकाचे नाव सुदाम व दुसऱ्याचे नाव ज्ञानेश्वर. दोघेही एकाच ओळीत राहात होते. ज्याचे लवकर आवरेल तो दुसऱ्याला शाळेत जाताना हाक द्यायचा. दोघे मिळून शाळेत जायचे. एकाच बाकावर बसायचे. मिळूनच शाळेतून परत यायचे. अगदी जिगरी दोस्त होते एकमेकांचे. एक दिवस असेच दोघेजण शाळेत चालले होते. चालता चालता सुदाम म्हणाला,

" देन्या, आज लई खुशीत दिसते स्वारी. विज्ञानाचा गृहपाठ केलायस वाटतं ?

"सुदाम्या, आज तूच गृहपाठ केलेला दिसतोय. म्हणून एवढया रुबाबात मला विचारतोस काय ? " ज्ञानू उत्तरला.

" देन्या लेका, उगाच काय मस्करी करतोस. अर, सायन्सचं एवढे ज्ञान असतं तर कशाला मार खाल्ला असता रोज वर्गात ?" काकुळतीने सुदाम म्हणाला.

" म्हणजे सायन्सचा गृहपाठ केला नाहीस तर तू पण"

आपल्याला जोडीदार मिळाल्याच्या आनंदात देन्याने उडी मारली.

"देन्या, लेका खोटं कशाला सांगू? अगदी आईच्यानं सांगतो, मी गृहपाठ केलेला न्हाय" सुदामाने कबुली दिली.

"बेस्ट दे टाळी. मी पण गृहपाठ केला नाही,"ज्ञानू आनंदाने ओरडला.

" देतो रे टाळी, पण आज वर्गात मार खायची आहे पाळी!" सुदाम गंभीरपणे उत्तरला.

" खरंच की रं! " ज्ञानेश्वर भानावर येऊन उद्गारला, "लई कंटाळलो या सायन्सला. सुदाम्या, याला काहीतरी तोड काढ बाबा."

सुदाम व ज्ञानेश्वर दोघेही चिंतेत पडले काय करावे ते दोघांनाही सुचेना. दोघेही विचार करू लागले. इतक्यात सुदाम मध्येच चुटकी वाजवून म्हणाला,

" हां, अरे अगदी नामी तोड सापडली. बेस्ट आयडिया देन्या, दे टाळी. आळी मिळी गुप चिळी. मी काय सांगतो ते नीट ऐक. कोणाला काय सांगायचं न्हाय " ... ..

ठण ऽऽ ठण ऽऽ ठण ऽऽ

तिसरा तास संपला. पानसे गुरुजी वर्गाबाहेर जायला निघाले. मुलांनी गोष्ट पुढे सांगण्याचा आग्रह धरला.

"अरे, आता आणखी दहा दिवस तुम्हाला गोष्टच ऐकायची आहे

पानसे गुरुजींनी मुलांची समजूत काढली व ते वर्गाबाहेर पडले.
___________________________
विज्ञान राक्षस
" विज्ञानावर आधारित शास्त्रीय नियमांची आलटा पालट झाली तर काय गम्मत घडेल हे सांगणारी विज्ञान कल्पनिका .."
लेखक :
पु. ग. वैद्य © 1977
संपादन व पुनर्लेखन :
प्रसाद पोफळी
9822569648

Monday, April 30, 2018

विज्ञान राक्षस : 1 : प्रस्तावना

1.

विज्ञान राक्षस : 1 : प्रस्तावना
________________________

बालमित्रांनो,

आता सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. परीक्षा सुरू असे पर्यंत सारखी डोळ्यावर बसून असणारी झोप आता कुठे गायब झाली कुणास ठाऊक !! ना शाळा, ना अभ्यास, ना आईची सारखी असणारी भुणभुण ... खेळावं म्हटलं तर दुपारी तापणारे ऊन बाहेर पडू देत नाही. मग आता करायचं तरी काय ?? .... असा प्रश्न तुम्हा साऱ्यांच्याच मनात सारखा येत असणार.

काय म्हणता ... आमच्या लहानपणी आम्ही काय करायचो ? अरे आम्ही ना, पुस्तकं वाचायचो !! खूप सारी पुस्तक वाचली आहेत आम्ही सुट्ट्यांमध्ये ... पण आजकालची तुम्ही मुलं इंग्रजी माध्यमातून शिकणारी... मराठी वाचायचं म्हटलं तर फार कंटाळा येतो, हो ना !! आणि त्यातही एखादी पौराणिक किंवा ऐतिहासिक गोष्ट असेल ना, मग तर विचारायलाच नको ..!!

पण मित्रांनो, माझ्या लहानपणी आम्ही केवळ ऐतिहासिक किंवा पौराणिक गोष्टीच वाचायचो असं काही नव्हतं ... आम्ही विज्ञान कथा पण वाचायचो ... खूप गम्मत यायची त्या गोष्टी वाचतांना !! काय म्हणता ... तुम्हाला पण वाचायला आवडेल अशी विज्ञानकथा !! पण आमच्या वेळची ती पुस्तक आता तुम्हाला मिळायची नाहीत. आपण असं करू या, मी रोज थोडी थोडी गोष्ट इथे टाईप करून पाठवत जाईन तुम्ही रोज थोडी थोडी वाचत जा… म्हणजे मला पण फार त्रास होणार नाही आणि तुम्हाला पण मजा येईल !! चला तर मग ....

या गोष्टीच्या पुस्तकाचं नाव आहे " विज्ञान राक्षस" ..!!

कोण हा राक्षस ?? आणि राक्षस असून याचं नाव विज्ञान कसं ??

हे सर्व कळेल पण ... उद्या ... तोपर्यंत जरा धीर धरा ..!!
___________________________
विज्ञान राक्षस
" विज्ञानावर आधारित शास्त्रीय नियमांची आलटा पालट झाली तर काय गम्मत घडेल हे सांगणारी विज्ञान कल्पनिका .."
लेखक :
पु. ग. वैद्य © 1977
संपादन व पुनर्लेखन :
प्रसाद पोफळी
9822569648




विज्ञान राक्षस : 5 : हळूनगरी

5. विज्ञान राक्षस : 5 : हळूनगरी _____________________________________ दुसरा तास संपल्याचे दोन टोले झाले. पानसे गुरुजी नववीचा क्लास घे...